कॉलेजचे ते दिवस अजूनही आठवतात. तुझी भिरभिरती नजर, इकडे-तिकडे बघण्याचा खोटा प्रयत्न आणि हळूच चोरट्या नजरेने माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसणं. तुझ्या या प्रकाराचं मला खूप कुतूहल वाटायचं. तुझा तो शांत चेहरा सतत मला शोधायचा. कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून हळूच खाली वाकून बघणं आणि मी पाहिल्यावर लगेच मागे होऊन दुसरीकडे बघण्याचं नाटक करणं. या सगळ्याची मला खूप मजा वाटायची. नकळत मला त्याची सवय झाली आणि माझीच नजर तुला पाहण्यासाठी भिरभिरायला लागली. एव्हाना तुलासुद्धा हे समजलं होतं! आठवतं तुला? एकदा तुझ्या मित्रांसोबत सिगरेट ओढताना पाहिलं होतं. तुझ्या मागेच होते मी. तुला बघून क्षणभर मी तिथेच थांबले. मला बघून ती सिगरेट तुझ्या मित्राला दिलीस. तुझं ते वागणं आणि माझं तिथून निघून जाणं मला खूप विचित्र वाटत होतं. नकळत मीसुद्धा तुझ्या प्रेमात पडले. माझं सारं विश्वच बदललं तुझ्यामुळे. आपलं हे अबोल प्रेम खूप दिवस चाललं. कॉलेजचं शेवटचं वर्ष उजाडलं. आपल्या प्रेमातला एक असा टप्पा, जिथे प्रेम व्यक्त केलं, तर केलं आणि नाही केलं, तर कधीच नाही! बस्स्, ठरवलं की, मी पुढाकार घेईन. आज आपल्या प्रेमाला चार वर्षं झाली. या चार वर्षांत आपण अनेक संकटांना तोंड दिलं. तू माझी सोबत कधीच सोडली नाहीस. तुझ्या प्रेमाने मला जगण्याची नवी दिशा मिळाली. असं म्हणतात, की प्रेम कधी सुखासुखी मिळत नाही. हे खरं आहे. अपेक्षेप्रमाणे तुझ्या घरच्यांकडून विरोध होणार, हे मला माहीत होतं. पण प्रेम ठरवून तर होत नाही ना! शेवटी ते तुझे आईवडील. त्यांच्या भावना मी समजू शकते. पण मी? माझ्या भावना? त्यांचं काहीच मोल नाही? मी तुझ्यावर निस्वाथीर् प्रेम केलं. माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यात संपतं. माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर. देव आपल्याला कधीच वेगळं नाही करणार. कारण या प्रेमाचा धागा त्यानेच बांधलाय. या चार वर्षांत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. आज एकच मागणं आहे. तू आपलं प्रेम घरच्यांसमोर उघड कर. प्रेमासाठी तू फक्त एक पाऊल उचल. तुझ्यासाठी मी सर्व आयुष्य देईन. तुझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुझ्याआधी समोरी जाईन. चार वर्षांपूवीर् मी पुढाकार घेतला होता. आज मी तुझी वाट बघतेय. तू कधी पुढाकार घेशील?
No comments:
Post a Comment